शेंदुर्णी, ता. जामनेर- शेंदुर्णी शहरात अवैध सावकारीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, सावकारांच्या कथित जाचाला कंटाळून भगवान रामदास बाविस्कर यांनी आत्महत्या केल्याच्या प्रकरणात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी भगवान रामदास बाविस्कर यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सुरुवातीला पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, मृताच्या पत्नीने दिलेली फिर्याद आणि भगवान बाविस्कर यांनी आत्महत्येपूर्वी आपल्या मित्राला पाठविलेला व्हॉट्सअॅप संदेश यामधून आत्महत्येमागील कथित कारणे समोर आली.
फिर्यादीतील आरोपांनुसार, भगवान बाविस्कर यांनी काही व्यक्तींकडून व्याजाने पैसे घेतले होते. घेतलेल्या रकमेपेक्षा अनेक पटीने अधिक पैसे परत करूनही संबंधितांकडून वारंवार पैशांची मागणी केली जात होती. तसेच वड्या-पावाच्या दुकानावर येऊन शिवीगाळ करणे, कुटुंबाला धमकावणे, अपमानास्पद भाषा वापरणे आणि पैशांसाठी मानसिक त्रास देणे असे प्रकार सुरू होते.
काही व्यक्तींकडून वारंवार धमक्या दिल्या जात असल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. मृत्यूच्या आधीच्या दिवशी म्हणजेच ३० ऑक्टोबर रोजी भगवान बाविस्कर यांनी आपल्या पत्नीला आणि मुलांना या त्रासाची माहिती दिली होती. कुटुंबीयांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला; मात्र कथित आर्थिक व मानसिक त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप पत्नीने फिर्यादीत केला आहे.
शेंदुर्णी शहरात अवैध सावकारी, विनापरवाना व्याजाने पैसे देणे आणि भिशीच्या माध्यमातून होणाऱ्या आर्थिक व्यवहारांबाबत यापूर्वीही अनेकदा चर्चा झाली आहे. गरजू नागरिकांना आर्थिक अडचणीच्या काळात पैसे देऊन नंतर अवाजवी व्याजाची मागणी करणे, मुद्दलापेक्षा कितीतरी अधिक रक्कम वसूल करणे आणि वसुलीसाठी धमकावणे असे प्रकार घडत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत. राज्याचे महसूलमंत्री यांनी यापूर्वी अवैध सावकारीविरोधात कठोर कारवाईचे निर्देश दिलेले असतानाही अशा प्रकारची गंभीर घटना घडणे ही चिंतेची बाब आहे.
भगवान बाविस्कर यांच्या आत्महत्येच्या घटनेने अवैध सावकारीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. केवळ एका प्रकरणापुरती कारवाई न करता शहरातील विनापरवाना सावकारी करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्या आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करावी, तसेच दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. सावकारीच्या विळख्यात आणखी किती कुटुंबे उद्ध्वस्त होण्याची वाट प्रशासन पाहणार? हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
मृताच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून 1 ) शरद बाबुराव बारी, 2) गोपाल बाबुराव बारी, 3) गोकूळ शिवाजी भोई, 4) गणेश शंकर कोळी, 5) गणेश सुकलाल गुजर, 6) गणेश मधुकर बारी, 7) अनिल सीताराम चौधरी 8) केशव पिंटूलाल भावसार या आठ जणांविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक २२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०८, ३५१(२), ३५२, ३(५) तसेच महाराष्ट्र सावकारी अधिनियम कलम ३९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार शिबरे करीत आहेत अशी माहीती पोलीस सुत्राकडून आहे .