पोलीस कोठडीत सियाकडून पहिल्यांदाच धक्कादायक दावा , साखरपुडा झाल्यानंतर मी केतनला चेतन चौधरी याच्यासोबत सुरू असलेल्या माझ्या प्रेमसंबंधांची माहिती दिली होती, मात्र तरीही तो माझ्याशी लग्न करण्यावर ठाम होता . .

पुणे – मावळातील लोहगड किल्ल्यावर हत्या झालेल्या २५ वर्षीय केतन अगरवाल या तरुणाच्या प्रकरणात दिवसागणिक नवनवी माहिती समोर येत आहे. सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांनी मिळून केतनचा निर्दयीपणे जीव घेतला. मात्र सिया गोयल या तरुणीचं चेतनवर प्रेम होतं तर तिने केतन अगरवाल याच्याशी साखरपुडा का केला आणि नंतर त्याला सगळं स्पष्ट सांगण्याऐवजी त्याचा जीव का घेतला, असा प्रश्न वारंवार उपस्थित होत आहे. अशातच आरोपी सियाची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू असून आता तिने नवा दावा केला आहे. साखरपुडा झाल्यानंतर मी केतनला चेतन चौधरी याच्यासोबत सुरू असलेल्या माझ्या प्रेमसंबंधांची माहिती दिली होती, मात्र तरीही तो माझ्याशी लग्न करण्यावर ठाम होता, असं सियाने पोलिसांना सांगितलं आहे.मिळालेल्या माहितीनुसार, केतन अगरवाल आणि सिया गोयल यांचा साखरपुडा फेब्रुवारी महिन्यात झाला होता आणि नोव्हेंबरमध्ये ते दोघे लग्नही करणार होते. या नव्या नात्यामध्ये केतन अत्यंत आनंदी असल्याचं विविध व्हिडिओंमधून स्पष्ट दिसत आहे. आपली होणारी पत्नी सिया हिला खूश करण्यासाठी तो आपल्याकडून शक्य असलेले सर्व प्रयत्न करत होता. मात्र सिया चेहऱ्यावर हास्य दाखवत असली तरी तिच्या डोक्यात मात्र वेगळंच काहीतरी सुरू होतं. सियाने प्रियकर चेतन चौधरी याच्या साथीने कट रचून केतनचा जीव घेतला. सीसीटीव्ही फुटेजमधून याबाबतचं सत्य समोर आल्यानंतर पोलिसांनी सियासह तिचा प्रियकर चेतन चौधरी याला ताब्यात घेतलं असून सध्या दोघेही पोलीस कोठडीत आहेत. सिया गोयल हिने आपला होणारा पती केतन अगरवाल याची हत्या नेमकी कशी केली आणि कोणत्या कारणातून त्याला संपवलं, याबाबत पोलीस कोठडीत तिची चौकशी केली जात आहे. यावेळी तिने सांगितलं की, मी साखरपुडा झाल्यानंतर केतनला सगळं खरं सांगितलं होतं. चेतनसोबत असलेल्या प्रेमसंबंधाची माहिती देत मला तुझ्यासोबत लग्न करण्यात रस नसल्याचं केतनला कळवलं असल्याचा दावा तिने केला आहे. मात्र हे सगळं सांगितल्यानंतरही केतनकडून लग्नाची तयारी सुरूच होती, असं सियाचं म्हणणं आहे. दरम्यान, सिया किंवा तिच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याकडून आम्हाला तिच्या आधीच्या प्रेमप्रकरणाबाबत माहिती देण्यात आलेली नव्हती, असा दावा केतन अगरवाल याच्या वडिलांकडून यापूर्वीच करण्यात आला आहे. त्यामुळे आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या चौकशीत पुढील काही दिवसांत नेमकं काय सत्य समोर येतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.