प्रकाश सकट यांच्या कुटुंबाला ४० लाख रुपयांचा विमा धनादेश प्रदान

शेंदुर्णी : नगरपंचायतीतील कर्मचारी प्रकाश सकट यांचे मम्मा देवी पुलावरून पडून दुर्दैवी निधन झाले होते. त्यांच्या पश्चात कुटुंबीयांना आर्थिक आधार मिळावा यासाठी त्यांच्या बँक ऑफ महाराष्ट्रमधील खात्याशी संबंधित विमा योजनेअंतर्गत ४० लाख रुपयांची विमा रक्कम मंजूर करण्यात आली. या विमा रकमेचा धनादेश सकट कुटुंबीयांना मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

यावेळी नगराध्यक्ष गोविंद अग्रवाल, उपनगराध्यक्ष शरद बारी, बँक ऑफ महाराष्ट्रचे झोनल मॅनेजर अभिषेक चौबे, पाचोरा शाखा व्यवस्थापक अभिलेश वराडे, शर्मा, गटप्रमुख अतुल बारी, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गरुड, नगरपंचायत कर्मचारी, नगरसेवक तसेच सकट परिवारातील सदस्य उपस्थित होते.

यावेळी बँक ऑफ महाराष्ट्रचे झोनल मॅनेजर अभिषेक चौबे यांनी कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या Salary Insurance तसेच Life Insurance योजनांची माहिती दिली. या योजनांमुळे खातेदार व त्यांच्या कुटुंबीयांना आकस्मिक परिस्थितीत मिळणारे आर्थिक संरक्षण, विमा लाभ आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या सुविधांची माहिती त्यांनी उपस्थितांना समजावून सांगितली.

प्रकाश सकट यांच्या कुटुंबीयांना मिळालेली ४० लाख रुपयांची विमा मदत ही त्यांच्या कुटुंबासाठी आर्थिक आधार ठरणार असून, अशा विमा योजनांबाबत प्रत्येक नागरिकाने जागरूक राहण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली.

आकस्मिक संकटाच्या काळात विमा हा कुटुंबासाठी आर्थिक आधार ठरू शकतो, असा संदेश या प्रसंगातून देण्यात आला.