चोरीचा गुन्हा उघडकीस, बैलजोडी हस्तगत

Screenshot

शेंदुर्णी, ता. जामनेर प्रतिनिधी –    पिंपळगाव गोलाईत शिवारातून चोरीस गेलेली बैलजोडी हस्तगत करण्यात पोलीस पथकाला यश आले आहे. बैलजोडीसह चोरीसाठी वापरलेला टेम्पो असा एकूण दोन लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. ५ ऑक्टोबर रोजी पिंपळगाव गोलाईत शिवारातून एक लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीची बैलजोडी अज्ञात व्यक्तींनी चोरून नेली होती. याप्रकरणी शेतकऱ्याच्या फिर्यादीवरून पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे यांनी तपासासाठी पथके तयार केली. गोपनीय माहितीच्या आधारे संजय प्रल्हाद पाटील आणि ज्ञानेश्वर गणपत पाटील (दोघे रा. सोनाळा, ता. जामनेर) यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यांनी साथीदार दिनेश उर्फ टेलर जगन्नाथ पाटील आणि ईश्वर बहादूर पाटील यांच्या मदतीने बैलजोडी चोरल्याची कबुली दिली. तसेच ती सुसनगाव येथील व्यापारी पिंटू याला विकल्याचे सांगितले.

त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे, पोलीस उपनिरीक्षक गणेश सुसते व पथकाने पिंटू उर्फ नरेंद्र श्रावण गोखरे यांच्या शेतातून बैलजोडी हस्तगत करून मूळ मालकाला परत केली.

चोरीचा माल खरेदी केल्याप्रकरणी गोखरे यांच्याविरोधातही कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात गणेश सुसते, दीपक पाटील, ईश्वर कोकणे, सत्यवान कोळी, वैभव देशमुख आणि चालक हेमंत सोनवणे यांचा समावेश होता. पुढील तपास दीपक पाटील करीत आहेत.