मेणगाव येथे १४ व १५ नोव्हेंबरला राज्यस्तरीय श्री गजानन महाराज भक्त संमेलन दोन दिवसीय भक्त मेळाव्यात कीर्तन, प्रवचन, भजन, आध्यात्मिक मार्गदर्शन व महाप्रसादाचे आयोजन

शेख हमीद शेंदुर्णी : जामनेर तालुक्यातील मेणगाव येथे श्री गजानन महाराज भक्त परिवाराच्या वतीने शनिवार, दि. १४ व रविवार, दि. १५ नोव्हेंबर २०२६ रोजी दोन दिवसीय श्री संत गजानन महाराज भक्त मेळावा व राज्यस्तरीय भक्त संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. मेणगाव येथील श्री गुरु गजानन धाम परिसरातील वंदनीय कुसुमताई वाडेकर व्यासपीठावर हा सोहळा संपन्न होणार आहे.

या संमेलनात राज्यातील विविध भागांतील गजानन महाराज भक्त, संत साहित्याचे अभ्यासक, कीर्तनकार व प्रवचनकार सहभागी होणार आहेत. संमेलनाची सुरुवात दीपप्रज्वलन व ग्रंथपूजनाने होणार असून, जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीशभाऊ महाजन यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. पहिल्या दिवशी प्राचार्य गोगले गुरुजी यांचे नामजप, शैलेशजी वसंतराव देशकर यांचे ‘सद्गुरु श्री गजानन बाबा व संत समागम’ या विषयावर, तर प्रा. मिलिंदजी मधुकरराव डोंगरे यांचे ‘जीवन आणि संत साहित्य’ या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. तसेच श्यामनारायणदासजी चावरे महाराज, सुनील पाटील यांचे मार्गदर्शन, संजय व प्राचार्य अनंतराव सिरसाट यांचे विविध आध्यात्मिक विषयांवर मार्गदर्शन होणार आहे. याशिवाय संमेलनाच्या आयोजनाविषयी संकल्पना विश्लेषण, सेवाव्रत पुरस्कार वितरण आणि समारोपाचा कार्यक्रम होईल. दोन्ही दिवस भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.

पहिल्या दिवशी प्राचार्य गोगले गुरुजी यांचे नामजप व साधनेविषयी विवेचन, महिला भजनी मंडळाचा भजन कार्यक्रम आणि रात्री ह.भ.प. डॉ. विकासजी वाडकर यांचे हरिकीर्तन आयोजित करण्यात आले आहे.

दुसऱ्या दिवशी प्रा. डॉ. देविदासराव ताटे, गजानन भक्त संतरामजी ढेपे (अण्णा) यांचे विविध आध्यात्मिक विषयांवर मार्गदर्शन होणार आहे.

या भक्त संमेलनाच्या माध्यमातून श्री गजानन महाराजांचे विचार, संत साहित्य, भक्ती, नामस्मरण व आध्यात्मिक परंपरेचा प्रसार करण्याचा आयोजकांचा मानस आहे. पंचक्रोशीसह राज्यातील गजानन भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आध्यात्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री गजानन महाराज मंदिर समिती, मेणगाव, सोयगाव व शेंदुर्णी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

फोटो -इश्वर रमेश पाटील या कलाकाराने काढलेली रांगोळी.