जळगाव – स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत विधान परिषदेच्या जागेबाबत प्रचंड राजकीय गोपनीयता पाळली जात आहे. अर्ज भरण्यासाठी सोमवारचा एकमेव दिवस उरला असला तरी महायुतीमध्ये ही जागा कुणाच्या वाट्याला आहे, याची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, ही जागा भाजप लढवणार असल्याचे सांगण्यात येत असले तरी भाजपनेही उमेदवारीबाबत अद्याप ‘ब्लाइंड गेम’ खेळला आहे. जळगाव विधानपरिषदेच्या जागा महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट लढवणार असून, त्यांनी उमेदवारदेखील निश्चित केला आहे. मात्र, महायुतीकडून अद्याप ही जागा कोण लढवणार, याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. भाजप व शिवसेनेमध्ये या जागेसाठी गेल्या दहा दिवसांपासून रस्सीखेच सुरू आहे. शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांचे पुत्र प्रतापराव पाटील इच्छुक असल्याने ही स्पर्धा तीव्र झाली आहे. शनिवारी दुपारी पालकमंत्री गुलाबराव पाटील याच चर्चेसाठी मुंबईला रवाना झाले आहेत.
दिल्ली व मुंबईत वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत याबाबत झालेल्या चर्चेनुसार ही जागा भाजपची असल्याने स्थानिक नेत्यांनी जागा शिवसेनेला देऊ नये, असा आग्रह धरला आहे. त्यामुळे ही जागा भाजपकडे राहणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. दुसरीकडे भाजपकडून अद्याप उमेदवाराचे नाव जाहीर झाले नसल्याने इच्छुकांमध्ये धाकधूक वाढली आहे. पक्षांतर्गत नाराजी टाळण्यासाठीच भाजपच्या नेत्यांकडून उमेदवारीबाबत ‘ब्लाइंड गेम’ खेळला जात आहे. नामांकन दाखल करण्यासाठी अखेरची मुदत सोमवार एक जूनपर्यंत आहे. सुट्टीच्या अगोदर शनिवारी सात इच्छुकांनी १२ अर्ज नेले आहेत. आतापर्यंत ५४ उमेदवारांच्या समर्थकांकडून तब्बल ९१ अर्ज नेले आहेत, तसेच शुक्रवारी एक आणि शनिवारी दोन असे आजअखेर एकूण तीन अपक्ष उमेदवारांनी नामांकन प्रपत्र निवडणूक अधिकाऱ्यांकडे दखल केले आहेत. यात अमळनेर येथील प्रवीण गंगाराम पाटील, रावेर येथील दारा मोहंमद आणि धरणगावचे नीलेश चौधरी या अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.



