मुंबई – महाराष्ट्र राज्यात सार्वजनिक आरोग्याच्या संरक्षणासाठी आणि प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या संघटीत्त अवैध व्यापाराला आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. गुटखा, तंबाखू किंवा निकोटीनयुक्त पानमसाला तसेच तत्सम तंबाखू-मिश्रित प्रतिबंधित अन्नपदार्थाचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण व विक्री करणाऱ्या संघटीत नेटवर्क्सविरुद्ध पात्र प्रकरणांत महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम, १९९९ म्हणजेच मकोका लागू करण्याबाबत सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज स्पष्ट आदेश दिले आहेत. भारताच्या संविधानाच्या कलम ४७ नुसार सार्वजनिक आरोग्य सुधारण्याची आणि आरोग्यास अपायकारक पदार्थांच्या सेवनास प्रतिबंध करण्याची जबाबदारी राज्यावर आहे. गुटखा, तंबाखू किंवा निकोटीनयुक्त पानमसाला आणि अशा प्रकारचे प्रतिबंधित पदार्थ हे सार्वजनिक आरोग्यास गंभीर धोका निर्माण करणारे आहेत.
अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ अंतर्गत असुरक्षित अन्नाचे उत्पादन, साठवणूक, वितरण किंवा विक्री करणे हा गंभीर गुन्हा आहे. सदर अधिनियमाच्या कलम ५९ अंतर्गत अशा गुन्ह्यांसाठी अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ अंतर्गत असुरक्षित अन्नाचे उत्पादन, साठवणूक, वितरण कारावासाची तरतूद आहे. कलम ६४ अंतर्गत पुनरावृत्ती झाल्यास वाढीव शिक्षेची तरतूद आहे. तसेच कलमे ३८ व ४१ नुसार अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना तपासणी, शोध व जप्तीचे अधिकार देण्यात आले आहेत. कलम ४२ अंतर्गत अभियोजन सुरू करण्याची प्रक्रिया नमूद आहे. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम, १९९९ अंतर्गत “सतत चालणारी बेकायदेशीर कृती”, “संघटित गुन्हा” आणि “संघटित गुन्हेगारी सिंडिकेट” याबाबत स्पष्ट तरतुदी आहेत. एखादा गुन्हा दखलपात्र असून तीन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षेस पात्र असेल, मागील दहा वर्षांत एकापेक्षा अधिक आरोपपत्रे दाखल झालेली असतील आणि न्यायालयाने त्यांची दखल घेतलेली असेल, तसेच दोन किंवा अधिक व्यक्ती आर्थिक लाभासाठी समन्वयाने कार्यरत असतील, तर अशा प्रकरणात मकोका लागू करण्याची पात्रता तपासून कारवाई करण्याचे तुकाराम मुंढे यांनी निर्देश दिले आहेत. या निर्देशांनुसार, प्रतिबंधित अन्नपदार्थांशी संबंधित प्रत्येक अंमलबजावणी कारवाईत अन्न सुरक्षा अधिकारी आणि नामनिर्देशित अधिकारी यांनी मकोका लागू होण्याची पात्रता तपासणे आवश्यक राहील. पात्रता सिद्ध झाल्यास संबंधित प्रकरणात अन्न सुरक्षा व मानके अधिनियमातील लागू तरतुदींसह मकोका अंतर्गतही कारवाई करण्यासाठी पोलिसांशी समन्वय साधला जाईल. मात्र, मकोका लागू करण्यासाठी अधिनियमाच्या कलम २३ अंतर्गत आवश्यक असलेली प्रक्रिया काटेकोरपणे पाळली जावी, असे तुकाराम मुंढे यांनी निर्देश दिले आहेत.
सदर निर्देशांमध्ये केवळ किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई करण्याऐवजी संपूर्ण नेटवर्कवर कारवाई करण्यावर भर देण्यात आला आहे. उत्पादक, वित्तपुरवठादार, प्रमुख पुरवठादार, वाहतूकदार, गोदाम चालक, घाऊक विक्रेते आणि किरकोळ विक्रेते यांची साखळी पुराव्यांच्या आधारे स्पष्ट करण्यात येणार आहे. संघटित स्वरूपाचे प्रकरण असल्यास उपलब्ध पुराव्यांच्या आधारे नेटवर्कमधील सर्व ओळख पटलेल्या अशा संघटीत कार्यरत सदस्यांविरुद्ध कारवाई करण्याचा दृष्टिकोन स्वीकारण्यात येईल. यामुळे प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या अवैध व्यापारातील मुख्य सूत्रधार व आर्थिक लाभार्थी यांना कायद्याच्या चौकटीत आणणे शक्य होईल.



