ऑपरेशन ब्लू स्टार ला आज 42 वर्ष पूर्ण झाले. 1984 मध्ये अमृतसर येथे ब्लू स्टार ऑपरेशन राबवण्यात आलं होतं. भारतीय लष्कर जवानांनी खलिस्तानचा सर्वोच्च नेता याच्या विरोधात राबवलेल्या ऑपरेशनला आज तब्बल ४२ वर्षे पूर्ण झाले, हा दिवस लक्षात घेऊन खलिस्तान नॅशनल आर्मी यांनी मेल पाठवला आहे का याचा देखील तपास सुरू आहे, ऑपरेशन ब्लू स्टार चा बदला घेण्यासाठी देशातील तीन मुख्य कार्यालय उडवून देण्याची मेल मधून धमकी आल्याची माहिती आहे.
पुणे महापौर कार्यालयाला बॉम्बस्फोटाची धमकी ?
पुणे महापौर कार्यालयाच्या अधिकृत ई-मेल आयडीवर बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ई-मेल आल्याने खळबळ उडाली आहे. मिळालेल्या ई-मेलनुसार पुणे महापौर कार्यालय, नागपूरमधील काही ठिकाणे तसेच RSS मुख्यालयाला लक्ष्य करण्याची धमकी देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. ई-मेलमध्ये IED बॉम्बस्फोटाचा उल्लेख करण्यात आला असून, काही विशिष्ट वेळा आणि तारखांचाही संदर्भ देण्यात आला आहे. धमकीचा ई-मेल मिळताच पोलीस, बॉम्ब शोधक व नाशक पथक तसेच सायबर विभाग सतर्क झाला असून, ई-मेलची सत्यता आणि त्यामागील व्यक्तीचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. ई-मेल कोणत्या ठिकाणाहून पाठवण्यात आला, तो खरा आहे की बनावट, याची तपासणी यंत्रणांकडून केली जात आहे. सध्या कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आलेली नसून, सुरक्षा यंत्रणांनी खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित परिसरात सुरक्षा वाढवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे महापौर कार्यालयाच्या अधिकृत ई-मेल आयडीवर थेट बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देणारा एक निनावी ई-मेल आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. या ई-मेलमध्ये केवळ पुण्याचे महापौर कार्यालयच नव्हे, तर नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आणि नागपूरमधील काही अतिसंवेदनशील ठिकाणांना लक्ष्य करण्याचा दावा करण्यात आल्याने गृह विभाग तात्काळ सतर्क झाला आहे.
IED बॉम्बस्फोटाचा उल्लेख; वेळ आणि तारखाही –
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या धमकीच्या ई-मेलमध्ये अत्यंत घातक अशा ‘आयईडी’ बॉम्बचा वापर करून हे स्फोट घडवून आणले जातील, असा इशारा देण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हे कृत्य करण्यासाठी ई-मेल पाठवणाऱ्याने काही विशिष्ट वेळा आणि तारखांचाही स्पष्ट संदर्भ दिला आहे. यावरून हा केवळ खोडसाळपणा आहे की यामागे एखादे मोठे षडयंत्र आहे, यादृष्टीने तपास यंत्रणांनी तपास सुरू केला आहे.
सायबर पोलिसांकडून ‘आयपी ॲड्रेस’चा शोध –
हा ई-मेल खरा आहे की केवळ दहशत निर्माण करण्यासाठी पसरवलेली अफवा यादृष्टीने सायबर विभागाचे तांत्रिक तज्ज्ञ काम करत आहेत. हा ई-मेल कोणत्या देशातून किंवा राज्यातून पाठवला गेला, त्याचा ‘आयपी ॲड्रेस’ काय आहे आणि व्हीपीएनचा वापर केला गेला आहे का, याची सखोल तांत्रिक तपासणी सुरू आहे. पुणे पोलीस आणि नागपूर पोलीस या दोन्ही शहरांतील यंत्रणा एकमेकांच्या संपर्कात असून, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि घाबरून जाऊ नये, असे आवाहन पोलिसांमार्फत करण्यात आले आहे.



