सलमान खान 1974 पासून गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहतो. पण आता तो नवीन घरात राहायला जाणार असल्याचे समोर आले आहे. त्याच्या नव्या घराचे बांधकाम सुरू असून त्यासाठी बीएमसीकडूनही रीतसर परवानगी घेण्यात आली आहे.
बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान वांद्रे येथे आपल्या कुटुंबासाठी समुद्र मुखी सहा मजली नवीन इमारत बांधणार आहे. ‘महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी’ने (MCZMA) या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. ही जमीन अभिनेत्याच्या आईच्या नावे रजिस्टर आहे. हे नवीन घर वांद्रे येथील चिंबई भागात बांधले जाणार आहे; हे ठिकाण सलमान खानच्या सध्याच्या ‘गॅलेक्सी अपार्टमेंट्स’ या निवासस्थानापासून अगदी जवळ आहे. सलमान खान ‘गॅलेक्सी अपार्टमेंट्स’ मध्ये 1974 पासून राहत आहे. 2024 मध्ये दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी ‘गॅलेक्सी अपार्टमेंट्स’ बाहेर गोळीबार केला होता. तपासादरम्यान हे हल्लेखोर बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याचे समोर आले होते. या घटनेनंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करून त्याला ‘वाय-प्लस’ दर्जाची सुरक्षा देण्यात आली. ज्या बाल्कनीतून तो आपल्या चाहत्यांना भेटायचा, ती आता बुलेटप्रूफ काचेने सुरक्षित करण्यात आली आहे. MCZMA च्या सूत्रांनुसार, सलमान खान यांची आई सलमा खान यांच्या नावे असलेल्या जमिनीवर हे नवीन घर बांधले जाणार आहे. या जमिनीवर यापूर्वी 1956 च्या सुमारास बांधलेली दुमजली इमारत होती; ती जीर्ण अवस्थेत असल्याने, सलमानच्या कुटुंबाने ती जागा विकत घेतली अन् ती पाडून टाकली. नवीन इमारतीत तळमजला, स्टिल्ट पार्किंग आणि वरती सहा मजले असतील. याचे एकूण बांधकाम क्षेत्रफळ सुमारे 1014 चौरस फूट असेल. या प्रोजेक्टचे काम ‘सच डेव्हलपर्स’ द्वारे केले जाईल. बीएमसीने या प्रोजेक्टसाठी ऑक्टोबर 2025 मध्ये प्राथमिक परवानगी दिली होती.



