अमळनेर मध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिवंतपणी माणसाला किंमत आहे की नाही? हा एक गंभीर प्रश्न असतानाच, मेलेल्या माणसाचे मृतदेह वाहून नेण्यासाठी चक्क घंटा गाडीचा वापर करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
जळगाव : एखाद्या शहराची ओळख केवळ रस्ते, इमारती किंवा विकासकामांवरून होत नाही, तर तेथील प्रशासन जिवंत आणि मृत नागरिकांशी किती सन्मानाने वागते? यावरूनही ठरते. मात्र अमळनेर शहरात गेल्या काही दिवसांत समोर आलेल्या घटनांनी नगरपरिषदेच्या संवेदनशीलतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे, शहराच्या हद्दीत मृतावस्थेत आढळलेल्या बेवारस प्रेताची शवविच्छेदनानंतर अंत्यसंस्कारासाठी स्वतंत्र वाहनातून विल्हेवाट लावण्याची आवश्यकता आहे. हे काम कचरा संकलन करणाऱ्या ठेकेदाराला बंधनकारक असताना देखील एक बेवारस प्रेताची ग्रामीण रुग्णालयातून विल्हेवाट लावताना चक्क कचरा वाहणाऱ्या घंटा गाडीतून वाहून नेण्यात आल्याचा असंवेदनशील प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मृत्यूनंतरही माणसाच्या सन्मानाची अशी पायमल्ली होत असेल तर ही केवळ प्रशासकीय अथवा ठेकेदाराची चूक नसून मानवतेलाच काळिमा फासणारी बाब असल्याची भावना व्यक्त होत आहे. या घटनेपूर्वी देखील अमरधाम स्मशानभूमीतील विदारक वास्तवही समोर आले होते. प्रभाग क्रमांक ३ च्या नगरसेविका शोभाबाई गढरे, राष्ट्रवादी युवकचे शहर अध्यक्ष दुर्गेश पाटील यांनी केलेल्या आरोपांनुसार, अंत्यसंस्कारासाठी पुरेसे सरण (गौरी )उपलब्ध नसल्याने अनेक मृतदेह पूर्णपणे जळत नाहीत. परिणामी अर्धवट जळालेल्या अवशेषांची भटक्या कुत्र्यांकडून लचके तोडून विटंबना होत असल्याचे प्रकार वारंवार घडत होता. याशिवाय स्मशानभूमीत कायमस्वरूपी कर्मचारी नसल्याने दुःखाच्या प्रसंगी आलेल्या नातेवाईकांनाच सर्व व्यवस्था स्वतः करावी लागत असल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली होती.
नगरपरिषदचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. “झालेला प्रकार हा असंवेदनशील असून कचरा संकलन करणाऱ्या ठेकेदाराला बेवारस प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र वाहनाची सोय करणे बंधनकारक आहे. असं असताना देखील संबंधित ठेकेदाराने अक्षम्य चूक केलेली असल्यामुळे त्याला नोटीस बजावून कायदेशीर कारवाई करण्यात येईल”, अशी प्रतिक्रिया मुख्याधिकारींनी दिली आहे.



