
शेंदुर्णी, ता. जामनेर | वार्ताहर जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी हे व्यापारी, शैक्षणिक, कृषी व आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे केंद्र म्हणून ओळखले जाते. परिसरातील अनेक गावांतील नागरिकांचे दैनंदिन प्रशासकीय व्यवहार शेंदुर्णीशी निगडित असूनही महसूल विभागाच्या विविध कामांसाठी त्यांना जामनेर तहसील कार्यालयात जावे लागते. त्यामुळे शेंदुर्णी येथे स्वतंत्र अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याची मागणी दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहे.
उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्र, फेरफार, जमीन महसूल विषयक कामे, नैसर्गिक आपत्ती पंचनामे तसेच विविध शासकीय योजनांसाठी परिसरातील हजारो नागरिकांना वारंवार जामनेरला जावे लागते. त्यामुळे शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांचा वेळ, पैसा आणि श्रम यांचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत आहे.
शेंदुर्णी ही जामनेर तालुक्यातील प्रमुख व्यापारी बाजारपेठ असून येथे कपडा मार्केट, सोने-चांदीची बाजारपेठ, सहकारी बँका, सहकारी संस्था, सूतगिरणी, सात कापशी जिनिंग-प्रेसिंग मिल, ऑईल मिल तसेच विविध व्यावसायिक आस्थापना कार्यरत आहेत. या बाजारपेठेत दररोज कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल होत असून तालुक्यासह परिसरातील हजारो नागरिक विविध कारणांनी शेंदुर्णीत येत असतात.
कृषी क्षेत्रासाठीही शेंदुर्णी हे महत्त्वाचे केंद्र मानले जाते. शेतीपयोगी अवजारे, सिंचन साहित्य, कृषी उपकरणे, ठिबक व स्प्रिंकलर साहित्य, पंपसंच, पाइप, बियाणे, खते आणि इतर कृषी साहित्य खरेदीसाठी तालुक्यातील बहुतांश शेतकरी सर्वप्रथम शेंदुर्णीला प्राधान्य देतात. काही विशेष कृषी अवजारे किंवा साहित्य शेंदुर्णीत उपलब्ध नसल्यासच शेतकऱ्यांना सिल्लोड किंवा पाचोरा येथे जावे लागते.
शिक्षण क्षेत्रातही शेंदुर्णीची स्वतंत्र ओळख असून नर्सरीपासून महाविद्यालयीन शिक्षणापर्यंतच्या अनेक संस्था येथे कार्यरत आहेत. दररोज १० हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षणासाठी शेंदुर्णीत येतात. अपर तहसील कार्यालय सुरू झाल्यास विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक दाखले व शासकीय कागदपत्रे स्थानिक पातळीवर उपलब्ध होऊन त्यांचा वेळ आणि खर्च मोठ्या प्रमाणात कमी होईल.
नागरिकांच्या मते, शेंदुर्णी येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू झाल्यास महसुली सेवा अधिक जलद, पारदर्शक आणि परिणामकारक होतील. तसेच जामनेर तहसील कार्यालयावरील कामाचा ताण कमी होऊन प्रशासन अधिक सक्षम बनेल.
व्यापार, शिक्षण, कृषी आणि आर्थिक व्यवहारांचे प्रमुख केंद्र म्हणून शेंदुर्णीची ओळख आहे. हजारो नागरिक आणि शेतकरी दररोज येथे येतात. त्यामुळे शासनाने नागरिकांची दीर्घकालीन मान्य करून शेंदुर्णी येथे स्वतंत्र अप्पर तहसील कार्यालय तातडीने मंजूर करून सुरू करावे अशी परिसरातील नागरिक, शेतकरी, व्यापारी व सामाजिक संघटनांची एकमुखी मागणी आहे.



